Wednesday, December 02, 2009

शेवट

हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता
जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता

सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही
जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता

एकवारही मागे तुज बघता ना यावे?
इतका का दुस्वास करावा..जाता जाता?

चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली
मागमूस याचा न उरावा..जाता जाता

दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता

मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर
बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता

Monday, October 12, 2009

तू सांगितलंस म्हणून
मेकॅनिक्स् चं प्रकरण समजून घेताना
फोर्सेसचे कम्पोनन्ट्स् लिहू लागलो तेव्हा...
तेव्हा म्हणालीस,एफ् साइन् थिटा, एफ् कॉस् थिटाच्या
या प्रकरणात पडतोसच कशाला?
'प्रकरण' दोघांसाठी असतं,
अन् मेकॅनिक्स् फक्त मार्क मिळविण्यासाठी
प्रकरणाची जात एकच - लफडं हीच
लफडं करण्याची वेळ आली
तेव्हा हेच शब्द माझ्यावर आघात ठरले
कारण तुझ्या प्रकरणात नाव भलत्याचंच होतं
माझा आधारच काढून घेणारं!
***
गेल्या वार्षिक परीक्षेतमी बोंबललो होतो
पुन्हा वार्षिक परीक्षा आलीय...
आता पास व्हायचंच आहे
मागे खाल्लेली गटांगळी विसरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
पास होण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू आपटली असशीलच! सपशेल, नेहमीसारखीच
मीही आपटलो!! एटीकेटीच्या वर्षावात, दणदणीत
होणार्‍या प्लेसमेन्ट्सची भीती छातीत साठवून घेत!
पोट भरण्यासाठी नोकरी तर
आता मलाच शोधायची आहे
प्रकरणाच्या - लफड्याच्या - तुझ्या व्याख्येत
ती कुठे नसेलच!


मूळ रचना: श्रावण मोडक यांचे व्याकरण

Wednesday, July 15, 2009

प्रपोजल्

आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेचं
प्रपोजल् व्हायची वाट बघत

Thursday, June 04, 2009

सौभाग्य

खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले

हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...

Friday, March 06, 2009

भूल

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता

हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)

सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता