Monday, August 04, 2008

जालकवींच्या कविता: एक आवाहन

आरंभ: १४/०२/२००९ - ०९:००
समाप्ती: १६/०२/२००९ - २२:००
ठिकाण: सॅन होजे, कॅलिफोर्निया
माहितीचा स्रोत: मी स्वतः

सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या आंतरजालाच्या उगमस्थानी होणाऱ्या पहिल्यावहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात "काहीतरी वेगळे" स्वरूपाचा एखादा मराठमोळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आंतरजालीय साहित्याशी रसिकांची ओळख करून देणे या हेतूने मिलिंद भांडारकरांना सुचलेल्या एका कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने हे आवाहन करीत आहे. याबाबतीत संमेलनाच्या संयोजकांशी प्राथमिक बोलणे झाले असून तुमच्याआमच्यासारख्या हौशागवशा जालकवी,जालसाहित्यिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर कार्यक्रमाचे यश अवलंबून असणार आहे.

कार्यक्रमामागील भूमिका:
आंतरजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. मुद्रित साहित्याबरोबरच आणि प्रसंगी त्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमूलाग्र परिवर्तन जरी दिसत नसले, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवीन युगातील मराठी साहित्याच्या प्रसाराला खीळ बसण्यासारखे असेल. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.

कार्यक्रमाची रूपरेषा:
1. एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन.
2. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात - अर्थात मुद्रित स्वरूपात - प्रसिद्ध झालेल्या नाहीत/नसतील. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील.
3. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील व्यावसायिक - "प्रोफेशनल" - नसतील.
4. विडंबने चालतील. मात्र मूळ कविता आणि विडंबन दोन्ही जालप्रकाशितच हवे. तसेच, मूळ कवितेची निवड झाली, तरच तिच्या विडंबनाचीही निवड होईल; जेणेकरून दोन्हींचे एकत्र सादरीकरण व त्यायोगे अपेक्षित परिणाम साधता येईल.

मदत हवी आहे:
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.
1. आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला विरोपाने (ई-मेल)पाठवावे (ई-मेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा. कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी)
2. जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती.
3. ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.

आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.
1. मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)

2. चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)
([dot] ऐवजी ". ", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे. )

आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.

धन्यवाद!

5 comments:

आशा जोगळेकर said...

वा वा हे तर छानच झालं.

प्रशांत said...

सुरेख कल्पना आहे.
कवितांप्रमाणे गद्य-साहित्यालाही वाव मिळावा असं मी सुचवू इच्छितो.
या पोस्टाचा अधिकाधिक प्रचार व्हावा व मराठी ब्लॉगकारांकडून भरघोस प्रतिसाद मिळावा ही सदिच्छा.
-प्रशांत

Sumedha said...

खो दिलाय, बघ:

http://aapula-samwad.blogspot.com/2008/08/blog-post_28.html

Sumedha said...

तीन ओळींचा सुद्धा चालेल. let's roll it and see how it goes! ओळी किंवा मात्राची अट थोडी मोकळी ठेवावी असेच मनात होते, म्हणूनच "शक्यतो" असं म्हणलं.. शेवटी सगळ्या एकत्र करून काय स्वरुप येते ते बघायची उत्सुकता आहे! तुझ्या हायकूची वाट बघतीये :)

Chakrapani said...

या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात करण्यात आली असून कविता पाठविण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २००८ अशी निश्चित करण्यात आली आहे.