Monday, January 10, 2022

दीपगृहे

 मध्यसमुद्री डुचमळणारी




नाव एक विनावल्ह्यांची
उष्ण लाटेच्या झुळकेसरशी
शीड मोरपंखी फुटलेली
अवचित जन्मे एक सुकाणू,
डोलखांब, स्वप्नांचे तारू
डुलणे, झुलणे सारुन मागे
उधळे दर्यावर्दी वारू
शुभ्र, स्तब्धसा हिमनग तो, जो
लगाम होउन पुढे ठाकतो
हयात नसलेला चौखुर तो
पाणीपाणी होउन जातो
झुळूक होउन जी ती आली
तिच्या फुटावी ओठी, पोटी
नाव एक विनावल्ह्यांची
मध्यसमुद्री डुचमळणारी
कुठे सुकाणू, शीड कुठे
भरती ना ओहोटि कुठे
लाटेची अन नावेची त्या
जागोजागी दीपगृहे

No comments: