उन्हाची गणिते..न सुटणारी
उन्हाची गुपिते..न फुटणारी
उन्हाची झळ..लालभडक
उन्हाची कळ..पांढरीफटक
उन्हाची हाक..किती नाजूक
उन्हाचा धाक..किती साजूक
उन्हाची दिठी..आखीवरेखीव
उन्हाची मिठी..जाणीवनेणीव
उन्हाची कूस..कवितेची मूस
उन्हाचं मूल..कवडशाचं फूल
उन्हाची छाया..उन्हाची आस
उन्हाची माया..उन्हाचा वास
तुझं ऊन..की माझं ऊन
तू ऊन..की मी ऊन
आपण ऊन..आपणहून
गाभण ऊन..आपणहून
एकटाच मी..समोर ऊन
उन्हाचीच पावले..मागाहून
- चक्रपाणि
२५ जुलै २०२२
No comments:
Post a Comment