Monday, October 13, 2014

माझाच चंद्र
सतत हरवतो
तुझ्या आभाळी
कोसळणारे
गढूळ धबधबे
कडेकपारी
झडणारा मी
वसंत टपटप
अश्रूंमधला
ओळी कातर
उल्लेख पानभर
व्याकुळ शाई
बंद पापण्या
तवंग मणभर
साचवलेले
हिरव्याकंच
जखमांचे वैभव
मन शेवाळी

Thursday, September 18, 2014

पोकळी
--------------------------------------------
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले
सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले
व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे
एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले
जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा
वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले
पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली?
(श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले)
शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा
शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले
-------------------------------------------------
- चक्रपाणि (जून १२, २०१४ ०२:०३ a.m. - सप्टेंबर १८, २०१४ १२:४७ a.m.)

Tuesday, July 15, 2014

पूर्णविराम

एरव्ही संततधार बरसणारा मी
झिरपू लागतो जेव्हा
असंख्य प्रश्नचिन्हांची ओल बनून
माझ्याच एरव्हीच्या एकटाकी आयुष्यात
स्वल्पविरामासारखा(,)
उत्तरं बनून तेव्हा
माझ्या वाटणीचं, माझ्याऐवजीचं
बरसणं होऊन तेव्हा
पूर्णविराम देशील ना
या झिरपण्याला(?)

Wednesday, July 02, 2014

तू फक्त आजवर सुचणे
त्या सुचण्यावर मी घुटमळणे
ओळींच्या वळणावळणाने
भेटणे, दूरही होणे

शब्दांच्या पाणवठ्यावर
स्मरणांची ओंजळ भरणे
बदलून कूस तू हसणे
मी मलाच माझा दिसणे

सोनसळी उद्याची किरणे
क्षितिजावर तांबड फुटणे
आशेच्या पाखरांचे अन्
लगबगीतले किलबिलणे

दिवसातले आजचे सुचणे
इतकेच पुरेसे असणे,
सवयीच्या घुटमळण्याला
आसक्त उद्याची वळणे

- चक्रपाणि, जुलै २, २०१४.

Friday, June 27, 2014

(मॉडर्न) कणा
===================

आज मटण घेतलंन् मस्त
बॅंकेतून पैसे काढुन
सुका मेवाही घेतला थोडा
उरल्यासुरल्यामधून

भुरकत, ढेकरत पोराने
जास्तीचा रस्सा मागितला,
त्याच्याच भाषेत त्याला मग
टक्क्यांचा नियम सांगितला

"समजत नाही एकदाच सांगून?"
दिली सणसणीत ठेवून
"तुझा २७ टक्के साल्या
कधीच झाला ना देऊन?!"

भुकेला माझा पोर म्हणाला
"इफ्तार पार्टीत खातो
जाताना यातला पाच टक्के
मेवा घेउन जातो

उधर हम सब साथी मिलके
शीरकुर्मा खानेवाले हैं
हिंदू मुस्लिम भाइयोंके अब
अच्छे दिन आनेवाले हैं"

कान पकडुन खेचला त्याला
श्टडी टेबलाकडे
"लैंगिक शिक्षण नको, गिरव तू
संस्कृतीचे धडे!

अच्छे दिन सगळ्यांचेच नसतात,
लक्षात ठेव हे पक्के!
आपले अच्छे दिन म्हणजे रे
मार्कशिटवरचे टक्के!"

"बाबा, लवकर पळा", म्हणाला,
"लेक्चरबाजी बास!
दिवस आजचा शेवटचा
काढायला मासिक पास

भाडं वाढेल, टक्का रोडेल,
मोडणार नाही कणा!
पेपर जरा बाजूला ठेवा,
आता 'लढ' म्हणा!"

Monday, June 09, 2014

दाखला
=================================

मागितलाच कोणी कधी
माझ्या जिवंतपणाचा पुरावा,
की शोधाशोध चालू होते असंख्य
कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची,
अश्रू पडून फुटलेल्या शाईची,
(त्यातलं काही नाहीच मिळालं,तर)
आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची
(पण हे सगळं कधीच संपून गेलंय!)
फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची
(आता तर तुझा नंबरही माहीत नाही)
...
न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी
निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं,
इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला
पुरेसा नाहीये का तुला?
(का पुरेसा नाहीये तुला?)

- चक्रपाणि
- जून ९, २०१४

Saturday, March 13, 2010

बेघर

दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं
या पावसातही तुझ्या आठवणींना
लपेटून घेतलं मी कवितेत.
हळूच दुडले काही दिवस
एकमेकांसोबतचे
शाकारली स्वप्नांची कौलं
नि पडलो जरासा वाचत मजेत
नव्या छपराखाली त्याची वाट बघत
चवदार शब्दांचे घुटके घेत

पण वाचता वाचता डोळा लागताच
हा कोसळून गेला धबाधबा
माझी फिरकी घेत.

जाग येऊन बेघर झालो पुन्हा
नि फुटक्या कौलांचा तो ढीग
घेतला पुन्हा कवेत.

आता
आधी कौलं घालू की वाचन संपवू
इतकाच प्रश्न आहे.

पुन्हा बेघर व्हायची भीती वाटते ना!

Tuesday, March 09, 2010

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच,
मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -
https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

Wednesday, December 02, 2009

शेवट

हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता
जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता

सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही
जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता

एकवारही मागे तुज बघता ना यावे?
इतका का दुस्वास करावा..जाता जाता?

चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली
मागमूस याचा न उरावा..जाता जाता

दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता

मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर
बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता

Monday, October 12, 2009

तू सांगितलंस म्हणून
मेकॅनिक्स् चं प्रकरण समजून घेताना
फोर्सेसचे कम्पोनन्ट्स् लिहू लागलो तेव्हा...
तेव्हा म्हणालीस,एफ् साइन् थिटा, एफ् कॉस् थिटाच्या
या प्रकरणात पडतोसच कशाला?
'प्रकरण' दोघांसाठी असतं,
अन् मेकॅनिक्स् फक्त मार्क मिळविण्यासाठी
प्रकरणाची जात एकच - लफडं हीच
लफडं करण्याची वेळ आली
तेव्हा हेच शब्द माझ्यावर आघात ठरले
कारण तुझ्या प्रकरणात नाव भलत्याचंच होतं
माझा आधारच काढून घेणारं!
***
गेल्या वार्षिक परीक्षेतमी बोंबललो होतो
पुन्हा वार्षिक परीक्षा आलीय...
आता पास व्हायचंच आहे
मागे खाल्लेली गटांगळी विसरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
पास होण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू आपटली असशीलच! सपशेल, नेहमीसारखीच
मीही आपटलो!! एटीकेटीच्या वर्षावात, दणदणीत
होणार्‍या प्लेसमेन्ट्सची भीती छातीत साठवून घेत!
पोट भरण्यासाठी नोकरी तर
आता मलाच शोधायची आहे
प्रकरणाच्या - लफड्याच्या - तुझ्या व्याख्येत
ती कुठे नसेलच!


मूळ रचना: श्रावण मोडक यांचे व्याकरण

Wednesday, July 15, 2009

प्रपोजल्

आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेचं
प्रपोजल् व्हायची वाट बघत

Thursday, June 04, 2009

सौभाग्य

खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले

हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...

Friday, March 06, 2009

भूल

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता

हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)

सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता

Wednesday, October 29, 2008

पालखी

पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८

'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी!

दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

Wednesday, October 15, 2008

काही त्रिवेणी

*****************************************
ठाऊक होतं येईल पत्र तुझं फक्त आजच
त्यातल्या संवादानंतर चालू होणार माझं आत्मवृत्त

इतकी कशी ही शांतता बोलभांड?!
*****************************************
कुरूप वेडं बदकपिलू एका तळ्यातलं
गुंगलंय राजहंस व्हायची वाट बघण्यात

पण शेवटी हिणवणारच सगळे 'अल्पसंख्यक' म्हणून!
*****************************************

Tuesday, October 14, 2008

(अशीही एक) कोजागिरी

आलेत एकाच दिवशी पूर
चांदण्यावरच्या कवितांचे
चंद्र,भरती नि शब्द - भलतेच
गेलेत वरती म्हणायचे!

कोजागिरीला हवा कशाला
बिलियन्स् चा बेल्-आउट्?
******************
मिळतील तितके चंद्र घालून
बांधल्या असत्या कित्येक भेळी
भरतीपण मग आली असती
सांगेन तश्शी - नेमक्या वेळी

भेळवाला बघा मराठी,
'भैयाची भेळ' आउट्!
*****************
दाट सायीच्या पडद्याआडून
गोड चेहरा दिसला असता
(हाती ग्यालन् 'फॅट्-फ्री'चे, अन्
विचारसुद्धा पातळ नसता)

कुण्याकाळची याद कुणाची
छळे अशी थ्रूआउट्
*****************

Tuesday, September 09, 2008

एक त्रिवेणी

सुमेधाने साखळी हायकू साठी खो दिल्यानंतर केलेले वाचन आणि लेखन यातून सुचलेली एक त्रिवेणी -

वाचून लोकसत्तेतल्या पुराच्या बातम्या
कोरडेटाक पडतात हल्ली डोळे


सरकार थोडंच कधी कुठे वाहून जातं?!

Monday, September 08, 2008

साखळी हायकू

मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची कल्पना तिला सुचली.
तर नियम :
१) खाली मी लिहिलेल्या हायकू प्रमाणे दोन/तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा. मात्र मी माझा हायकू तीन ओळींचा केला आहे आणि त्याचं स्वरूप किंचितसं बदललं आहे. मूळ स्वरूपाशी इमान राखायचेच असल्यास सुमेधाचा हायकू पहावा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या
ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगची link द्या.

आता माझी कडी:

जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं

माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी

आणि माझा खो
प्रशांत आणि सारिकाला.

Monday, August 04, 2008

जालकवींच्या कविता: एक आवाहन

आरंभ: १४/०२/२००९ - ०९:००
समाप्ती: १६/०२/२००९ - २२:००
ठिकाण: सॅन होजे, कॅलिफोर्निया
माहितीचा स्रोत: मी स्वतः

सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या आंतरजालाच्या उगमस्थानी होणाऱ्या पहिल्यावहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात "काहीतरी वेगळे" स्वरूपाचा एखादा मराठमोळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आंतरजालीय साहित्याशी रसिकांची ओळख करून देणे या हेतूने मिलिंद भांडारकरांना सुचलेल्या एका कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने हे आवाहन करीत आहे. याबाबतीत संमेलनाच्या संयोजकांशी प्राथमिक बोलणे झाले असून तुमच्याआमच्यासारख्या हौशागवशा जालकवी,जालसाहित्यिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर कार्यक्रमाचे यश अवलंबून असणार आहे.

कार्यक्रमामागील भूमिका:
आंतरजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. मुद्रित साहित्याबरोबरच आणि प्रसंगी त्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमूलाग्र परिवर्तन जरी दिसत नसले, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवीन युगातील मराठी साहित्याच्या प्रसाराला खीळ बसण्यासारखे असेल. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.

कार्यक्रमाची रूपरेषा:
1. एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन.
2. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात - अर्थात मुद्रित स्वरूपात - प्रसिद्ध झालेल्या नाहीत/नसतील. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील.
3. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील व्यावसायिक - "प्रोफेशनल" - नसतील.
4. विडंबने चालतील. मात्र मूळ कविता आणि विडंबन दोन्ही जालप्रकाशितच हवे. तसेच, मूळ कवितेची निवड झाली, तरच तिच्या विडंबनाचीही निवड होईल; जेणेकरून दोन्हींचे एकत्र सादरीकरण व त्यायोगे अपेक्षित परिणाम साधता येईल.

मदत हवी आहे:
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.
1. आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला विरोपाने (ई-मेल)पाठवावे (ई-मेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा. कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी)
2. जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती.
3. ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.

आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.
1. मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)

2. चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)
([dot] ऐवजी ". ", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे. )

आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.

धन्यवाद!

नेहमीच ... तुझ्यामुळे

तिन्ही त्रिकाळ
संध्याकाळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
मेंदूतले घोळ
पांजरपोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे

ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओले घसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे

शब्दांचा जाच
शब्दांना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओळींना धार
ओळींचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे

जगायचा वीट
जगतोय धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
मरणाशी भेट
कविताच थेट
नेहमीच ... तुझ्यामुळे