Saturday, July 19, 2008

मोरपिशी साडी

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात....
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या
पाचफुटी फुला....
उगीच का अत्तर लावतोस?

तुझ्या या मोरपिशी साडीनंच
"अत्तर शिंपडलंय या देखाव्यात''
निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं...
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सुगंधाचा कळस!

आहा... !
डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून.

बर आहे..., तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम...
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं सोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
न विस्कटता , न चुरगळता!

Thursday, July 17, 2008

बैल

आपण सगळेच बैल असतो
बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो
फक्त दोनवेळा जेवण आणि फोमच्या डबलबेडवर खूश असतो
बायकोच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो.
आपण सगळेच बैल असतो
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी
अंघोळीला आपली पाठ चोळावी
कधी तरी पुरणपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो
आपण सगळेच बैल असतो
आपल्याला आपण फसवले गेलो आहोत याची काही लाज नसते
ती जाणीवच थिजलेली असते
उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते
बायको माहेरी गेली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या बायकोच्या शोधात असतो
आणि नव्या बायकोकडे गेलो की जुनी कशी चांगली होती (?!?!?!) याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
-------------------------------------------------------------------------------------

प्रेरणा: विजुभाऊंचा बैल

Friday, July 11, 2008

छचोर

पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!

Tuesday, February 19, 2008

खर्डेघाशी

दिवसांवर दिवसांच्या राशी
जीवन म्हणजे खर्डेघाशी

फोडासम जपलेले शैशव
खपली धरते तळहाताशी

तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्‍याची इतकी बदमाशी?

बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी

भुकेल्यांस भाकरी नसे, अन
खाणारे खाऊन उपाशी

तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?

जरी वादळे येतीजाती
लाटांना भिडतात खलाशी

Thursday, October 25, 2007

पौर्णिमा

चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमा
रातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा

चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!

रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे
नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा?

रातरांगोळी तुझी मी वाट बघते राजसा
चांद होऊनी पुन्हा भरशील कोरी पौर्णिमा?

बघ मला, कोजागिरीचा चंद्रही पडु दे फिका
(ऐकले हल्ली जरा करते मुजोरी पौर्णिमा)

Sunday, August 26, 2007

गंध - एक विडंबन

पोळ्यांची ही कणिक जराशी घट्टच झाली
घालुन पाणी मृदुल करांनी मग धोपटली
शिणल्या देही उभ्याउभ्या मी पेंगत होते
"कंबर दुखली, हात मोडले",सांगत होते
वाट तव्याची पहात* इतके ताटकळावे?
सासूचे मग निमूट सारे शापच घ्यावे!

तोच कुठुनशी नाचत अल्लड नणंद आली
"दादा आला", मला म्हणाली, हसून गेली
(गंध-मोगरा लावित गेला पंख मनाला
चंद्र अचानक स्वप्नप्रदेशी दिसू लागला)

गंध कोणता करून गेला डंख मनाला?
काळ अचानक उघड्या डोळी दिसू लागला!
मार्ग मोकळा तोच जाहला, तुटली तंद्री
भांड्यामधला बिंदू इवला झाला मार्गी

मरगळ सगळी विसरुन देवा स्मरू लागले
मनी लाटणे सासूकडचे दिसू लागले
क्षणात एका जणू दुधाची गंगा आली
ओट्यावरती सुरेख नक्षी हसरी झाली

गंधाने 'त्या' तशी अवेळी जादू केली,
अशीच सगळी रात्रसुधा मग निघून गेली!

* तवा गरम व्हायची वाट पहात

मूळ रचना: गंध

Tuesday, February 27, 2007

ऋतू येत होते ऋतू ज़ात होते

ऋतू येत होते ऋतू ज़ात होते
बदलणे तुझ्याही स्वभावात होते


खुलाशातही प्रश्न मांडून गेले
अबोले तसे फार वाह्यात होते

मिरवले तुझे घाव मी राजबिंडे
(विव्हळणेसुद्धा बघ दिमाखात होते)

तिच्या सावलीला मिठी मारलेल्या
मला पाहिले मी कवडशात होते

ज़रा ज़ुंपले आज़ माझे मनाशी
(नको शांतता 'आतल्याआत' होते)

पुन्हा दैव आलेच वाटेस माझ्या
पुन्हा त्यापुढे टेकले हात होते


ज़मिनीचे सौजन्य़: वैभव ज़ोशी आणि मायबोली डॉट कॉमवरील गझल कार्यशाळा

Monday, February 26, 2007

(कारण) - एक विडंबन

पटकन संपणारी इंडियाची मॅच
नकोशी वाटायला लागते,
जेंव्हा
अवसानघातकीपणाचीच सवय करुन दिलेली असते
मग जिंकत आलो असलो तरी,
विकेट ज़ावीशी वाटते,
आणि
सचिनची विकेटसुद्धा देउन जाते एक अघोरी आनंद...
चला, बरं झालं साले हरले
आता निदान वर्ल्डकप पर्यंत काळजी नाही काहीच,
शिव्या घालायला आहे काहीतरी कारण आता.

प्रेरणा: कारण

Wednesday, February 21, 2007

कचोरी कचोरी

ही कचोरी माझ्याकडून सप्रेम "प्लेट"-

बशी घे, मिळे ही कचोरी कचोरी,
सदा रांग लागे दुकानी दुपारी.

कधी बादशाही, मसाला, बिहारी,
कधी गोड येथे चटपटी कचोरी.

असो मेजवानी, उपासास चाले,
दही-चाट जोडीस, खस्ता कचोरी.

भरावे, तळावे, सदा घाम गाळे,
गिऱ्हाईक आ वासुनी नित्य दारी.

कधी डालड्याचा डबा साफ नाही,
खऱ्या ग्राहकाला तरी माज नाही.

पगारास येथे कधी वाढ नाही,
चिडूनी वदाया परी तोंड नाही.

स्वतःचेच डोके अम्हाला नसे ते,
करू ढेरपोट्याच सांगेल ते ते.

जगाच्या मुखी ही कचोरीच मेवा,
जराशी उद्याला तळायास ठेवा.

================================

टिपाः १) हलवायाच्या दुकानातल्या कचोरी करणाऱ्या बल्लवाचे मनोगत
२) ढेरपोट्या= हलवाई स्वतः किंवा मुख्य आचारी

================================

मूळ रचनाः कचेरी.. कचेरी..

दुभंगलेला गोळा

अद्याप हाड नाही राणी तुझ्या जिभेला
थाटात राजसाचा उद्धार चाललेला

ज़ात्याच पक्षपाती साहेब लाभलेला
सेक्रेटरीचसाठी घेऊन कार गेला

साडेनवास होती गाठायची कचेरी
न्हाणीघरात कपडे पिळण्यात वेळ गेला

विद्वान कारट्याचे पाढे म्हणून झाले
हातात देत झाडू विचकून दात गेला

"भरभर ज़रा करा की!", डोळे 'हिचे' म्हणाले
एकेक श्वास माझा कणकेत दंगलेला

हातात लाटणे ती घेऊन आत येता
हनुमान, राम यांचा जप येथ चाललेला

आणीक तिंबण्याची फ़ुरसत इथे कुणाला!
सांधायचा कसा हा गोळा दुभंगलेला?
----------------------------------------------------------
आधारीतः
दुभंगलेला वाडा

मौज

झोके जुन्या दिसांचे झुलण्यात मौज आहे,
लाखो कळा उशाला, निजण्यात मौज आहे.

डोळ्यांत साठलेला, पडणार मात्र नाही,
पाऊस तोच ओला भिजण्यात मौज आहे.

सांजावले किनारे निमिषात सूर्य प्याले,
काळीज पेटलेले, वणव्यात मौज आहे.

वाटेत सांडलेल्या सगळ्या कळ्या मला दे,
होऊन वास त्यांचा फुलण्यात मौज आहे.

आकाश शांत काळे, ठिपक्यांत रात्र डोले,
तारा तुझा बनोनी तुटण्यात मौज आहे.

ओठांत आटलेल्या कवितेत तूच होती,
आणून आव मोठा हसण्यात मौज आहे.

ही रातही अडखळते

अवसान सगळे उसने
स्पर्शात एका गळते,
ओठांत सावर सजणा,
ही रातही अडखळते.

श्वासांत बागा फुलती,
मी अंगभर दरवळते,
जागून घे रे सगळी,
ही रातही अडखळते.

नजरेत थोडे कळते,
मौनात उरलेसुरले,
बघ चंद्र मग पाघळतो,
ही रातही अडखळते.

मोहरत काया अवघी
या चांदण्या विरघळती,
दवथेंब पानांवरती,
ही रातही अडखळते.

गुंतून पडले सगळे
वळणांत धागे बघ या,
डोळ्यांत अन ती मिटता,
ही रातही अडखळते.

शोध-१

अनिरुद्ध अभ्यंकरांच्या शोध या कवितेवर आधारीत आणि मिलिंद फणसेंच्या पृथक या गझलेतील एका कल्पनेवरून प्रभावित होऊन खरडलेलं काहीतरी -

या काळ्या मण्यांचं
ओझं घेऊन
मला आता ज़गणं
अशक्य झालंय
आता
यांचा दागिना तरी व्हावा
किंवा पूर्ण फ़ास तरी लागू देत

त्या दुधारी मोक्षाचा शोध
मी अजून सोडला नाहीये.

शोध-२

केशवसुमारांच्या शोधानंतर मी लावलेला आणखी एक शोध -

फ़ायली आणि बटाट्यांचं
ओझं घेऊन
मला आता पळणं
अशक्य झालंय
आता
हा प्लॅटफ़ॉर्म मोकळातरी व्हावा
किंवा विरार फ़ास्ट तरी लागू देत
विंडो सीटचा शोध

मी अजून सोडला नाहीये.

Monday, July 17, 2006

मागणे

मुंबईतील अतिरेकी हल्ल्यावरील माझी ही प्रतिक्रियाः


निपचित पडलेली लेकरे माउलीची
विव्हळत भोवळली आर्तताही स्वतःशी
विनयभंग आता आणखी सोसवेना
सहनशील आम्ही! दुःख हे बोलवेना

दिवस 'सोनिया'चे, 'मोहना'चे 'विलासी'
कण्हत-कुढत सोसे आज़ मुंबापुरी ही
दहशतीस बोला, आवरावे कुणाच्या?
'कहर','तोयबा'च्या; 'लालु' की 'कायदा'च्या?

पदर फेडलेली बापडी माय माझी
शरम पण तुला ना गंज़ल्या मनगटांची
भरुन बांगड्या घे वांझ या संयमाच्या
उडव कबुतरांना पांढऱ्या-शांततेच्या!

सहनशीलता अन् षंढता भिन्न आहे
समज़ले तुला? की आणखी वेळ आहे?
धुमसत्या चितांचे कर्ज़ डोक्यावरी घे
परतफेड म्हणुनी पेटती अंतरे दे

फुकट दवडण्याला वेळ उरलाच नाही
उगव सूड आता, मागणे अन्य नाही
ज़खम खोल आहे; फ़ायदा हा, न तोटा
मलम कर तिचे अन् होउदे वार मोठा

Friday, July 14, 2006

(सत्र)(असेही!) (विडंबन)

श्री. वैभव जोशी यांच्या 'सत्र' या अतिशय सुंदर गझलेचे माझ्या अल्पमतीने केलेले हे विडंबन आहे. मूळ कविता पुढीलप्रमाणेः

आठवांचे सत्र होते
चांदणे सर्वत्र होते

मोगऱ्याचा गंध होता
मात्र कोरे पत्र होते

विलगली दोन्ही शरीरे
श्वास का एकत्र होते ?

शेवटी परकेच आले
सोयरे इतरत्र होते

सख्य ना झाले कुणाशी
ह्रदयही सावत्र होते

जीवनाची कोठडी अन्
मृत्युचे वर छत्र होते..

आणि, त्यावरील हे मी केलेले विडंबनः

ढोसण्याचे सत्र होते
मद्यपी सर्वत्र होते

सुरमईचा गंध आला
तंदुरी इतरत्र होते

पापडांच्या कुरकुरीला
वेफ़रांचे छत्र होते

बाटल्या बरसून गेल्या
'वारुणी' नक्षत्र होते

शेवटी संत्रेच माझे
द्राक्ष ते सावत्र होते

"मी बुवा पाणीच प्यालो!"
(बरळणे एकत्र होते)

Tuesday, June 27, 2006

दिवे,चंद्र,तारे अता मालवू दे (गझल)

दिवे,चंद्र,तारे अता मालवू दे
नव्या जीवनाची निशा ज़ागवू दे


कशी रंगते संगती मी तुझ्या ते
पुन्हा, वेगळे रंगुनी, दाखवू दे


ज़री संपले शब्द माझे तुझे अन्
खुणा बोलती, बोलणे वाढवू दे


गळाभेट घेते तुझ्या लोचनांची
मिठीनेच त्यांच्या मला लाज़वू दे


उरावे किती अन् कसे हे बहाणे?!
विसरण्या स्वतःला तयां आठवू दे


ज़से हुळहुळावे उरी पाकळ्यांनी
तुझे श्वास गाली तसे खेळवू दे


तुझे ओठ की गोडवा अमृताचा?
मुखी तू मला, मी तुला साठवू दे


सख्या,थांब थोडा. चुके एक ठोका,
तरी धीट मी, हे तुला भासवू दे

Sunday, June 25, 2006

एफ. डी.

कधीतरी काय! बऱ्याचदा असं वाटतं,
ठेवावं बँकेत सगळं, मनात सारं जे साठतं.
काढावी एखादी एफ. डी., करावी स्वतःनेच छोटीशी कविता,
इंटरेस्ट रेट काहीही असो, पण आपला घडा सदैव रिता.
गुंतवलं काय मी, ते शेवटपर्यंत कळतच नाही.
हवाबंद टप्परवेअरमधले टवटवीत शब्द?
की आणखीनही बरंच काही?
घेऊ द्यावेत त्यांनाही मोकळे श्वास ,
पंखांत त्यांच्या म्हणून मीच हवा भरते.
पण आकाशात त्यांना सोडून द्यावं म्हटलं,
की आमची मिडलक्लास गुंतवणूक साली नेमकी मध्ये येते.
करायचं बंद त्यांना, साचेबद्ध ढंगात,
रुपडं त्यांचं जपायचं, कवितेच्या रंगात
पुन्हा नवीन एफ. डी., पुन्हा इंटरेस्ट मोजणे
चुचकारलेल्या शब्दांसाठी पुन्हा पिंजरे शोधणे

Wednesday, May 31, 2006

नटसम्राट

सोडणार आहे आता
माझे बोलणे मुक्याने,
एकटक भरणारे
कोरे डोळ्यांचे रकाने

काही काळ तरी तेथे
रंगमंच उभा होता,
टाळ्या घेतल्या मी किती
कसलेला अभिनेता

नांदी झालेली टेचात,
प्रवेशलो मी जोशात,
तीन तास संवादांचे
खेळ डोळ्यांत, रोमात

ज़रा उशीरा कळली
स्वस्त झालेली आसवे,
काढता का रडण्याची
तुम्ही माझ्या हो तिकीटे?

ओळखीचे झाले आहे
माझे नाटक तुम्हांला,
टाळ्या देता पहा किती
नुसत्या जाहिरातीला!

दुःख होते मलासुद्धा
वेळ,पैसा वाया ज़ातो,
बदल्यात तुम्हांला मी
तोचतोच माल देतो

अहो मलासुद्धा येते
खोड्या काढणे, लपणे,
उंडारणे, गाणी गाणे,
हसणे नि हसवणे

हसण्याचासुद्धा आता
करतो सराव थोडा,
तालमीला दौडवतो
नव्या नांदीचा हा घोडा

घंटा तिसरी झाली की
नवे नाटक बघूया,
नटसम्राटाचे रूप
थोडे वेगळे पाहूया

म्हणून म्हटले मघा
पुरे बोलणे मुक्याने,
एकटक भरणारे
कोरे डोळ्यांचे रकाने

बघताना नाट्य नवे
मात्र विसरू हे नका
अंतराला माझ्या पुन्हा
तिकीटाने मोज़ू नका

Thursday, May 11, 2006

उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे


उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे
परत डिवचले मी वादळाला ज़रासे

हसत अवस माझी काढते रोज़ खोडी
सतत लपवते ती चांदण्याला ज़रासे

चलबिचल कशाला होतसे पापण्यांची?
भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे

"सहज़ बघ विसरलो, लीलया, मी तुलाही!"
(अज़ुन फ़सवतो मी या मनाला ज़रासे)

विसर पडत जातो पांगणाऱ्या उन्हाचा
फ़िरुन मळभ येते आसऱ्याला ज़रासे
--- चक्रपाणि गुरु, ११/०५/२००६