Monday, October 13, 2014

माझाच चंद्र
सतत हरवतो
तुझ्या आभाळी
कोसळणारे
गढूळ धबधबे
कडेकपारी
झडणारा मी
वसंत टपटप
अश्रूंमधला
ओळी कातर
उल्लेख पानभर
व्याकुळ शाई
बंद पापण्या
तवंग मणभर
साचवलेले
हिरव्याकंच
जखमांचे वैभव
मन शेवाळी

Thursday, September 18, 2014

पोकळी
--------------------------------------------
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले
सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले
व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे
एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले
जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा
वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले
पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली?
(श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले)
शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा
शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले
-------------------------------------------------
- चक्रपाणि (जून १२, २०१४ ०२:०३ a.m. - सप्टेंबर १८, २०१४ १२:४७ a.m.)

Tuesday, July 15, 2014

पूर्णविराम

एरव्ही संततधार बरसणारा मी
झिरपू लागतो जेव्हा
असंख्य प्रश्नचिन्हांची ओल बनून
माझ्याच एरव्हीच्या एकटाकी आयुष्यात
स्वल्पविरामासारखा(,)
उत्तरं बनून तेव्हा
माझ्या वाटणीचं, माझ्याऐवजीचं
बरसणं होऊन तेव्हा
पूर्णविराम देशील ना
या झिरपण्याला(?)

Wednesday, July 02, 2014

तू फक्त आजवर सुचणे
त्या सुचण्यावर मी घुटमळणे
ओळींच्या वळणावळणाने
भेटणे, दूरही होणे

शब्दांच्या पाणवठ्यावर
स्मरणांची ओंजळ भरणे
बदलून कूस तू हसणे
मी मलाच माझा दिसणे

सोनसळी उद्याची किरणे
क्षितिजावर तांबड फुटणे
आशेच्या पाखरांचे अन्
लगबगीतले किलबिलणे

दिवसातले आजचे सुचणे
इतकेच पुरेसे असणे,
सवयीच्या घुटमळण्याला
आसक्त उद्याची वळणे

- चक्रपाणि, जुलै २, २०१४.

Friday, June 27, 2014

(मॉडर्न) कणा
===================

आज मटण घेतलंन् मस्त
बॅंकेतून पैसे काढुन
सुका मेवाही घेतला थोडा
उरल्यासुरल्यामधून

भुरकत, ढेकरत पोराने
जास्तीचा रस्सा मागितला,
त्याच्याच भाषेत त्याला मग
टक्क्यांचा नियम सांगितला

"समजत नाही एकदाच सांगून?"
दिली सणसणीत ठेवून
"तुझा २७ टक्के साल्या
कधीच झाला ना देऊन?!"

भुकेला माझा पोर म्हणाला
"इफ्तार पार्टीत खातो
जाताना यातला पाच टक्के
मेवा घेउन जातो

उधर हम सब साथी मिलके
शीरकुर्मा खानेवाले हैं
हिंदू मुस्लिम भाइयोंके अब
अच्छे दिन आनेवाले हैं"

कान पकडुन खेचला त्याला
श्टडी टेबलाकडे
"लैंगिक शिक्षण नको, गिरव तू
संस्कृतीचे धडे!

अच्छे दिन सगळ्यांचेच नसतात,
लक्षात ठेव हे पक्के!
आपले अच्छे दिन म्हणजे रे
मार्कशिटवरचे टक्के!"

"बाबा, लवकर पळा", म्हणाला,
"लेक्चरबाजी बास!
दिवस आजचा शेवटचा
काढायला मासिक पास

भाडं वाढेल, टक्का रोडेल,
मोडणार नाही कणा!
पेपर जरा बाजूला ठेवा,
आता 'लढ' म्हणा!"

Monday, June 09, 2014

दाखला
=================================

मागितलाच कोणी कधी
माझ्या जिवंतपणाचा पुरावा,
की शोधाशोध चालू होते असंख्य
कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची,
अश्रू पडून फुटलेल्या शाईची,
(त्यातलं काही नाहीच मिळालं,तर)
आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची
(पण हे सगळं कधीच संपून गेलंय!)
फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची
(आता तर तुझा नंबरही माहीत नाही)
...
न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी
निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं,
इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला
पुरेसा नाहीये का तुला?
(का पुरेसा नाहीये तुला?)

- चक्रपाणि
- जून ९, २०१४