Wednesday, May 31, 2006

नटसम्राट

सोडणार आहे आता
माझे बोलणे मुक्याने,
एकटक भरणारे
कोरे डोळ्यांचे रकाने

काही काळ तरी तेथे
रंगमंच उभा होता,
टाळ्या घेतल्या मी किती
कसलेला अभिनेता

नांदी झालेली टेचात,
प्रवेशलो मी जोशात,
तीन तास संवादांचे
खेळ डोळ्यांत, रोमात

ज़रा उशीरा कळली
स्वस्त झालेली आसवे,
काढता का रडण्याची
तुम्ही माझ्या हो तिकीटे?

ओळखीचे झाले आहे
माझे नाटक तुम्हांला,
टाळ्या देता पहा किती
नुसत्या जाहिरातीला!

दुःख होते मलासुद्धा
वेळ,पैसा वाया ज़ातो,
बदल्यात तुम्हांला मी
तोचतोच माल देतो

अहो मलासुद्धा येते
खोड्या काढणे, लपणे,
उंडारणे, गाणी गाणे,
हसणे नि हसवणे

हसण्याचासुद्धा आता
करतो सराव थोडा,
तालमीला दौडवतो
नव्या नांदीचा हा घोडा

घंटा तिसरी झाली की
नवे नाटक बघूया,
नटसम्राटाचे रूप
थोडे वेगळे पाहूया

म्हणून म्हटले मघा
पुरे बोलणे मुक्याने,
एकटक भरणारे
कोरे डोळ्यांचे रकाने

बघताना नाट्य नवे
मात्र विसरू हे नका
अंतराला माझ्या पुन्हा
तिकीटाने मोज़ू नका

Thursday, May 11, 2006

उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे


उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे
परत डिवचले मी वादळाला ज़रासे

हसत अवस माझी काढते रोज़ खोडी
सतत लपवते ती चांदण्याला ज़रासे

चलबिचल कशाला होतसे पापण्यांची?
भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे

"सहज़ बघ विसरलो, लीलया, मी तुलाही!"
(अज़ुन फ़सवतो मी या मनाला ज़रासे)

विसर पडत जातो पांगणाऱ्या उन्हाचा
फ़िरुन मळभ येते आसऱ्याला ज़रासे
--- चक्रपाणि गुरु, ११/०५/२००६

Sunday, May 07, 2006

पाठी फिराया झुरतात कोणी


आयुष्य सोने, लुटतात कोणी,
का या सणाला मुकतात कोणी?

अभ्यासताना इथली प्रमेये,
सोपी गणीते चुकतात कोणी.

का चालताना वळणांवरी या,
खोलात जाता बुडतात कोणी?

मागे पहाता मन सांडलेले,
पाठी फिराया झुरतात कोणी.

मीही न याला अपवाद व्हावे,
बागेत याही फुलतात कोणी.

मी छंदवेडा दुखऱ्या मनाचा,
ओठांत गाणी उरतात कोणी.

टाळून होतो बघ आसवांना,
मातीत मोती पुरतात कोणी!?
--- चक्रपाणि गुरु, २७/१०/२००५

तिचा पाऊस

(मालिनी)
(गणः- न-न-म-य-य)
---------------------------------
जलद गरजताना आसुही गात होते,
किरण मिसळताना हासुही साथ होते.
बिजलि थिरकताना श्वास झोकात डोले,
वळुनि बिलगताना ओठ ओठांत ओले.
नितळ जल गुलाबी लाल तू लाजलेली,
हसत जवळ येता लांब तू जाहलेली.
प्रणय उमलताना सांजही आटलेली,
विरहस्मृति सखीची आजही दाटलेली.
फिरुन बरसता पाऊस काही खुणावी,
नयन निथळता प्याल्यात तीही बुडावी.
सहज तडपताना वेदना ना उरावी,
तुज न विसरताही पापणी का सुकावी?
--- चक्रपाणि सोम, २२/०८/२००५

बालपण सदैव नटवायचं असतं

बावीस वर्षं आतापर्यंतची, सरली कशी कळलंच नाही,
नववी-दहावीत खुरटलेली दाढी, भरभर वाढलेली वळलंच नाही.
दाढीनं नेहमी वाढायचंच असतं,
एकविसानं बावीस व्हायचंच असतं,
आपण मात्र हाती धरून पेनाचा रेझर,
"क्लीन शेव्ह्ड" बालपण सदैव नटवायचं असतं.

इसापनीती हातची जाऊन फ़िजिक्स आलेलं कळलं नाही,
केमिस्ट्रीनं केलेली हकालपट्टी अकबर-बिरबलालासुद्धा वळलीच नाही.
मॅथेमॅटिक्ससुद्धा असंच अभ्यासायचं असतं,
इंजिनिअरींगच्या ऍडमिशन्ससाठी ताटकळायचं असतं,
मेकॅनिक्सचा पेपर देऊन झाल्यावरसुद्धा,
पंचतंत्र पूर्वीसारखंच वाचायचं असतं.

शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा,
पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही,
बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया,
कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत.
कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक,
मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं,
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं.

"बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा,
षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही,
"जाऊद्या जरा, खेळूद्या त्याला,"ची आउची माया,
पडद्याआड कधी सरली समजलंच नाही.
आपणसुद्धा कोणीतरी इंजिनिअर, डॉक्टर काहीतरी व्हायचं असतं,
नोकरीधंदा करून काहीतरी कमवायचं असतं,
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
--- चक्रपाणि सोम, ११/०७/२००५

Thursday, May 04, 2006

त्रास

'त्रास' ही माझी सगळ्यात लाडकी गझल. इतकी लाडकी, की माझं तिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम असेल. माझ्या इतर गझलांमधून जी अभिव्यक्ती झालेली नाही ती या गझलेतून झाली आहे, असे मला(च) वाटते. या गझलेसारखी दुसरी गझल किंवा कविता यापुढे माझ्याच्याने कधीच लिहिली जाणार नाही की काय असा एक (नकोसा वाटणारा) न्यूनगंड या गझलेने माझ्यात निर्माण केलाय.
ही ज़ुल्काफ़िया, गैर-मुरद्दफ़ गझल असून अशी गझल लिहिण्याचा हा माझा पहिलावहिलाच प्रयत्न होता, जो बव्हंशी यशस्वी ठरला आणि चिरंतन आत्मतृप्ती मिळवून देऊन गेला.
चपखल शब्दयोजना आणि मिसऱ्यांतून ओसंडून वाहणारे भाव हे या गझलेचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. तुम्हीही हिचे आशिक झालात तर त्यासारखी कौतुकाची पावती दुसरी कुठली नसेल माझ्यासाठी!
------------------------------------------------------------------
गर्दीत आठवांच्या झाले उदास जीणे,
विसरू कसा तुला मी? थांबेल श्वास घेणे.

मेघांतल्या सरींचा ग्रीष्मात भास होणे,
डोळ्यांतल्या ढगांनी मग पावसास गाणे.

सोसायचे किती मी हे लाड सागराचे?
(घेऊन चिंब लाटा भेटावयास येणे)

झाला सराव आता दुःखात रंगण्याचा,
बेरंग या सुखांची चित्रे भकास होणे.

शिकलोय मीच माझी भाषा मुक्या फुलांची,
उमलून एकदाचे कोमेजण्यास जाणे.

तू एकदा नव्याने, ये ना मिठीत माझ्या,
मी लांबवीन माझे मजलाच त्रास देणे.
--- चक्रपाणि बुध, १८/०१/२००६

तफावत

प्रस्तुत रचना माझ्या अमेरिकेतील विद्यार्थीदशेतील पहिल्या दीड-एक महिन्यांच्या अनुभवांचे चित्रण असून यातील काही शब्द अगर शब्दसमूहांचा कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तिसमुदाय, व्यावसायिक समुदाय, जाती,लिंग, धर्म इ. शी दूरान्वयानेही आलेला संबंध हा रचनेचे अविभाज्य अंग आणि माझा (क्षमाप्रार्थी) नाईलाज समजावा.
---------------------------------------------------------
गोरी कातडी मुलखाची उत्साही नि सौजन्यशील(?)...
रस्त्याने जाता येता हसतखेळत जातात,
"हे व्हॉट्स अप" म्हणून कधी टाळी देतात,
छोटीशी शिंक आली तरी "एक्स्क्युज मी" म्हणतात,
बसमधून उतरताना ड्रायव्हरलाही "गुड डे सर" म्हणतात.
देसी रक्तात अचंबा उसळू लागतो... त्याचा "बेस्ट"चा कंडक्टर तिकिट फाडत असतो... "गुड डे" शिवाय...

गोरी कातडी शुक्रवारी रात्री संगीतात डोले,
जोडीला असतातच भरलेले व्होडकाचे पेले,
शनिवारी रात्री बिछान्यात नवी संगत बोले,
रविवारी संध्याकाळी एकदाचे उघडतात यांचे डोळे.
देसी रक्तात पुन्हा अचंबा उसळू लागतो... त्याचा अर्धा शनिवार कचेरीत नि अख्खा रविवार बायकामुलांत जातो... सोलकढी नि तळलेल्या माशाच्या तुकड्याबरोबर...

गोऱ्या कातड्या जगापुढे नव्या खिडक्या उघडतात,
कला, वाणिज्य, विज्ञानात नवे झेंडे रोवतात,
देसी रक्ताच्या सिंचनानेच यांचे डॉलर्स पिकतात,
अहो, साडेचार उणे दीडसुद्धा कॅल्क्युलेटरवर करतात.
देसी रक्तात पुन्हा अचंबा उसळू लागतो... पावकी-निमकी नि मास्तरांच्या छड्या यातच त्याचा जन्म घडलेला असतो... कॅल्क्युलेटरशिवाय...

गोऱ्या कातड्या विद्यापीठातच शोषणनिवारण केंद्र उघडतात,
गोड हसून जखमेवर फुंकर घातल्याचे नवे नाटक करतात,
रात्री मागून भरधाव येऊन, "वि'ल फक युवर ऍस" म्हणत,
छद्मी हसत, सडके अंडे फेकून, भडवे, भरधाव निघून जातात.
देसी रक्तात पुन्हा अचंबा उसळू लागतो... त्याच्या गांधीजींनी दुसरा गालही पुढे केलेला असतो... मधलं बोट न दाखवता...

गोऱ्या कातडीत पिझ्झा बर्गर पोटभरून भरलेला,
देसी रक्तात पोळी भाजीचा स्वाद खोलवर भिनलेला,
गोऱ्या कातडीत नाही आई, नाही बाप-बहीण उरलेली,
एकेक यांची पॉर्न मुव्ही त्यांच्यासंगेच रंगलेली.

गोऱ्या कातडीत नाही प्रेम, बुद्धीवाद यांचा फार्स आहे,
देसी रक्ताचा एकेक थेंब देसी मातीचा वास आहे.
गोऱ्या कातड्या भंगारातले एफ-१६ विकून,
आईची माझ्या साडी फेडू पाहतात,
त्यांनातरी बिचाऱ्यांना हे कुठे माहीत,
आमच्याकडे भंग्यांनाही नियमित दिवाळी देतात.

--- (बिभत्स पण आवश्यक शब्दांसह पुनश्च क्षमाप्रार्थी) चक्रपाणि
शनि, १०/०९/२००५

अजून एकदाच सांगूदे

'अजून एकदाच सांगूदे' या माझ्या कवितेचा अर्थ आणि भावना अगदीच सोप्या आणि गोड आहेत असे मला वाटते. मला तिच्याबद्दल जे वाटत होतं, ते सगळं तिला सांगायचं आहे इतकंच! या कवितेशी मिळत्याजुळत्या भावना असलेली 'लफ़्ज़ों में कह ना सके, बिन कह भी रह ना सके' किंवा 'छुपाना भी नही आता, जताना भी नही आता' यांसारखी गाणीही छान आहेत. ऐकली आहेत? जरूर ऐका :)
------------------------------------------------------------------------------------------------

लायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,
प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,
पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,
जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.

भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,
विचारांची पानं फडफडत असतात,
काना,मात्रा,वेलांट्यांचं राहत नाही बंधन,
भास तुझेच शब्दाशब्दांत गप्पा मारत बसतात.

झिपऱ्या सावरणाऱ्या माडाच्या कुशीत,
तुझ्यामाझ्या हस्तरेषा नकळत मिसळून जातात,
ओल्या वाळूच्या मिठीतून अलगद स्वतःला सोडवत,
लाटाच आपल्या श्वासांची साक्ष बनून राहतात.

प्रत्येक ओळ लिहून संपल्यावर वाटतं,
शब्दसफर मुकी माझी इथेच आता थांबूदे,
मनाजोगती मांडामांड झाली एकदा अवसानाची,
की सगळं सगळं पुन्हा...अजून एकदाच सांगूदे.

किनऱ्यावरच्या त्या स्वप्नांची का परत उजळणी करायची,
छे! आता वास्तवाचा नवा ऋतूही अनुभवायला हवा,
आयुष्याच्या या वळणावर टाकताना पुढली पावलं,
हात तुझा असाच सतत हाती हवा.

नवे ऋतू, नवी स्वप्नं,
नव्याच दुनियेत आता बागडायचंय,
नवे चटके, नवे काटे,
अश्रूंनाही आता एकत्रच लपवायचंय.

सावली तुझीच पुढ्यात,
कायम माझ्या राहूदे,
अजून फक्त एकदाच बहुतेक हेच सांगायचं आहे,
आरशात जेव्हा बघशील,
दिसेल माझीच प्रतिमा,
श्वासाश्वासात तुझ्या आता असं नांदायचं आहे.

--- चक्रपाणि रवि, २४/०७/२००५

मेटामॉर्फॉसिस

ज्याला आपण चुकीने 'प्रेम' समजतो, त्या आयुष्यातल्या माझ्या पहिल्यावहिल्या 'क्रश' बद्दलची ही भाबडी अभिव्यक्ती.
------------------------------------------------------------------------------------------------

जुना फोटो शाळेतला आपला,
बघून लाजरं हसत होतो,
मित्रमैत्रिणी सारखं चिडवतात म्हणून,
बोलायलासुद्धा घाबरत होतो.

कुंचल्यात सदा इंद्रधनु तुझे,
गुणगुणलेल्या गाण्यातून तुलाच फक्त गायचो,
दररोज छातीशी धरून नवी कविता,
शाळेबाहेरच्या बसस्टॉपवर तासन् तास रेंगाळायचो.

शाळेतलं ते फुलपंखी प्रेम(?),
थरथरणाऱ्या हातांनी तुझ्या मनगटावर बांधलं,
एकाच चॉकलेटच्या अर्ध्या-अर्ध्या गोडीसारखं,
"सी प्लस एम्" तळहातावर मेंदीसारखं रंगलं.

साडेतीन वर्षांच्या मोठ्या(?)(!) गॅपनंतर,
आज वागण्याबोलण्यातली मॅच्युरिटी क्षणोक्षण जाणवतेय,
भूतकाळातली ती अल्लड गुलाबी मजा,
आज लाजून लाजून नाही, तर खळखळून हसवतेय.

पहिल्यांदाच तुझ्याबरोबर कॉफी पिताना आज,
काय बोलू नि काय नको असं थोडसं होऊन गेलंय,
बोलते आहेस, हसते आहेस, टाळी देते आहेस तू सुद्धा,
नव्यानं बहरलेल्या मैत्रीनं आपल्या,संकोचाला कधीच पळवून नेलंय.

सोळा ते बावीसच्या या मेटामॉर्फॉसिसची कमाल,
निखळ मैत्रीची अवीट गोडी आज अनुभवतोय,
निरागस तुझं हसणं नि आपल्या गप्पा साठवत साठवत,
समोरची एस्प्रेसो उगाच(?) मिनिटामिनिटाला ढवळतोय.

अशीच तुझ्या हसण्याबोलण्याची पखरण,
गुंफूदे आठवणींच्या माळेत हरेक मोती नवा,
जगण्यासाठी प्रत्येक सेकंदाचा काटा,
अतूट आपल्या मैत्रीचा ताजा श्वास हवा.

--- चक्रपाणि शुक्र, १५/०७/२००५

गंध गजरा माळतो

छोटी बहर आणि मोठा गर्भितार्थ असलेली मला आवडणारी माझी आणखी एक गझल
-----------------------------------------------------------------------------------------

गंध गजरा माळतो,
मोगरा चेकाळतो.

चंद्र का डागाळतो?
चांदण्यांना टाळतो!

ऊन सोडुन चालले,
कवडसा रेंगाळतो.

ती म्हणाली, "गप्प हो!",
मौन आता पाळतो.

झेलतो भूकंप मी,
सारखा भेगाळतो.

"वेचुनी घ्या हो मला!!"
मी सुखांना चाळतो.

काय बाई खूळ हे!!
ओल पकडुन वाळतो.

--- चक्रपाणि गुरु, २२/१२/२००५