Sunday, May 07, 2006

बालपण सदैव नटवायचं असतं

बावीस वर्षं आतापर्यंतची, सरली कशी कळलंच नाही,
नववी-दहावीत खुरटलेली दाढी, भरभर वाढलेली वळलंच नाही.
दाढीनं नेहमी वाढायचंच असतं,
एकविसानं बावीस व्हायचंच असतं,
आपण मात्र हाती धरून पेनाचा रेझर,
"क्लीन शेव्ह्ड" बालपण सदैव नटवायचं असतं.

इसापनीती हातची जाऊन फ़िजिक्स आलेलं कळलं नाही,
केमिस्ट्रीनं केलेली हकालपट्टी अकबर-बिरबलालासुद्धा वळलीच नाही.
मॅथेमॅटिक्ससुद्धा असंच अभ्यासायचं असतं,
इंजिनिअरींगच्या ऍडमिशन्ससाठी ताटकळायचं असतं,
मेकॅनिक्सचा पेपर देऊन झाल्यावरसुद्धा,
पंचतंत्र पूर्वीसारखंच वाचायचं असतं.

शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा,
पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही,
बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया,
कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत.
कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक,
मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं,
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं.

"बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा,
षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही,
"जाऊद्या जरा, खेळूद्या त्याला,"ची आउची माया,
पडद्याआड कधी सरली समजलंच नाही.
आपणसुद्धा कोणीतरी इंजिनिअर, डॉक्टर काहीतरी व्हायचं असतं,
नोकरीधंदा करून काहीतरी कमवायचं असतं,
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
--- चक्रपाणि सोम, ११/०७/२००५

3 comments:

Anonymous said...

Sahi Re!!
Saket

Anonymous said...

मालाही माझ लहान पण आठवल,

Amit said...

Hey
Simplely Gr8 !!!!!!
I am misssing my childhood