Thursday, October 05, 2017

चंद्राचा पाढा

चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन
चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर
चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार,
चंद्र सक ओठावरचा तिळ, साता चंद्र हसू मधाळ
निरीनिरीतुन लगबगणारी चंद्र आठा बोटे आठ
खांद्यावरती पदर विसावे नव्वे चंद्र चोळीगाठ
भांगातिल कुंकू लावण्याने मुसमुसलेला चंद्रोदय
गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय

Tuesday, September 19, 2017

रूटीन

आंबलं अंग अंथरुणावर ठेवून,
बधीर मन हाताच्या उशीवर घेऊन,
चोवीस तास पापण्यांच्या चिटोऱ्यांवर लिहून,
मिटले मुखोद्गत असल्यागत

दिवसभरातल्या पापांचा,
कमावलेल्या पुण्याचा,
हक्कांचा नि ड्यूट्यांचा ,
डोळा लागला ठरल्यागत

नाव तुझं मात्र दिसेना कुठेच,
झोप उडाली गं खाडकन्..लगेच
(निद्रानाशाचं चाललंय; रूटीन..मजेत!
मानगुटीवर बसल्यागत)

आता,
तुझ्या नसण्याशी माझी ऍटॅचमेंट(!)
फोनवर ऐकवू कि व्हॉट्सऍपवर पाठवू
इतकाच प्रश्न आहे

तुझं रुटीन डिस्टर्ब व्हायला नको ना!