Sunday, January 16, 2022

वसुदेव

डोक्यावरच्या टोपलीतल्या
बाळकृष्णासारखं
अंगाखांद्यावरचे पक्षी नि त्यांची घरटी
तांबूसपोपटी पालवी नि तिचे बहर
सगळंसगळं सांभाळत
मुळं रोवून उभा
मी वसुदेव

पायाशी सरपटणारे असंख्य तण,
मांड्या-जांघा-कंबरेवर बांडगुळांचे मण
यमुनेच्या थाटात
कृष्णाकडे झेपावणारी
त्यातलीच इन-मिन तीन
आपल्याच फांद्या समजून
कृतकृत्य मी
त्यातल्याच एकाची हाक,
की श्वास,
की ओठ,
(अगदी आठवण)
विषकन्या असल्याच्या साक्षात्काराची वीज
टोपलीत न घालता स्वतःवर पाडून
उभाच्याउभा काळानिळा होऊन
देवकीविना उभा
मी वसुदेव

Saturday, January 15, 2022

जागरण

“फार जागरण करता का?”


मी हो म्हणायच्या आत म्हणाले -

“करत जाऊ नकात!

त्याने

बीपी..वाढेल,

पोट..सुटेल,

पोटात..मळमळेल,

पित्त..खवळेल,

चित्त..ढवळेल”


डॉक्टरांचं हे ऐकून मी म्हटलं - “डॉक्टर,


रोज तीन वेळा..खाणं

दोन वेळा..धुणं नि घासणं,

वीकेंडला एकदा..पिणं

क्वार्टरली खंडाळा, लोणावळ्याला..जाणं

करता का?


घराचे, गाडीचे, इन्शुरन्सचे..हप्ते

दूधवाला,केबल, मोबाईलची..बिलं

इन्कम, प्रॉपर्टी, वॅल्यु ऍडेड..टॅक्स

भरता का?


मुलाचा..होमवर्क

म्हाताऱ्याचा..आशीर्वाद

म्हातारीची..काळजी

मुलीला..कुशीत

बायकोला..घट्ट मिठीत

घेता का?


भिकाऱ्याला..भीक

देवळाला..दान

विद्यार्थ्यांना..पूर्ण मार्क्स

देता का?


याची उत्तरं हो असली काय

किंवा नाही असली काय


क्रियापदानंतरचा का

क्रियापदाच्या आधी लावा


नाय तुमची झोप उडाली,

तर पेशंट म्हणून नाव नाय सांगणार!

Monday, January 10, 2022

दीपगृहे

 मध्यसमुद्री डुचमळणारी




नाव एक विनावल्ह्यांची
उष्ण लाटेच्या झुळकेसरशी
शीड मोरपंखी फुटलेली
अवचित जन्मे एक सुकाणू,
डोलखांब, स्वप्नांचे तारू
डुलणे, झुलणे सारुन मागे
उधळे दर्यावर्दी वारू
शुभ्र, स्तब्धसा हिमनग तो, जो
लगाम होउन पुढे ठाकतो
हयात नसलेला चौखुर तो
पाणीपाणी होउन जातो
झुळूक होउन जी ती आली
तिच्या फुटावी ओठी, पोटी
नाव एक विनावल्ह्यांची
मध्यसमुद्री डुचमळणारी
कुठे सुकाणू, शीड कुठे
भरती ना ओहोटि कुठे
लाटेची अन नावेची त्या
जागोजागी दीपगृहे

Thursday, January 06, 2022

प्राणायाम

दोन बंद डोळ्यांत

करून घ्यायचे बंद

लुकलुकणारे तुझे स्वप्नील डोळे

फक्त माझ्याकडे बघत बसलेले

सताड उघड्या कानात
घ्यायची साठवून तुझी
वाणी, तुझी गाणी,
(माझी विराणी)

चढत्या प्रत्येक श्वासात
भिनावेत डोंगर, वारे,
झरे, धबधबे, तुझे अत्तर
केस मोकळे

आयाम माझ्या प्राणाचा हा एव्हढाच!

बाकी
उच्छवास (की उश्वास?),
(सुटका की) निश्वास..
सगळ्या अफवा आहेत

आपली बोटं एकमेकांत गुंतली असेपर्यंत