Sunday, January 16, 2022

वसुदेव

डोक्यावरच्या टोपलीतल्या
बाळकृष्णासारखं
अंगाखांद्यावरचे पक्षी नि त्यांची घरटी
तांबूसपोपटी पालवी नि तिचे बहर
सगळंसगळं सांभाळत
मुळं रोवून उभा
मी वसुदेव

पायाशी सरपटणारे असंख्य तण,
मांड्या-जांघा-कंबरेवर बांडगुळांचे मण
यमुनेच्या थाटात
कृष्णाकडे झेपावणारी
त्यातलीच इन-मिन तीन
आपल्याच फांद्या समजून
कृतकृत्य मी
त्यातल्याच एकाची हाक,
की श्वास,
की ओठ,
(अगदी आठवण)
विषकन्या असल्याच्या साक्षात्काराची वीज
टोपलीत न घालता स्वतःवर पाडून
उभाच्याउभा काळानिळा होऊन
देवकीविना उभा
मी वसुदेव

No comments: