Friday, March 12, 2021

पारंबी आणि थेंब

 तू पारंबी वटवृक्षाची थेंब मी इथे पागोळीवर तुला ओढ जी तुझ्या मुळाची आस माझि ती या छपरावर

ओघळेन मी तुला समांतर
जमिनीतल्या विश्वामध्ये
पोचलीस तू तिथे एकदा
की मग होइल माझे मुरणे

Monday, March 08, 2021

अर्ध्यामुर्ध्या परिघाचे गाणे

रुकारातल्या समेभोवती
थिजलेला मी अर्धा
व्याकुळतेच्या वृद्धीमधला
वेलांटीतुन अर्धा
या अर्ध्याचे त्या अर्ध्याशी वर्तुळ कैसे व्हावे
काने,मात्रा,वेलांट्यांचे का कोडे होऊन जावे?

गळाभेट, पण मीलन नाही,

परीमिती, पण स्थावर नाही,

द्विमीतीतल्या प्रदक्षिणेचे पाश कसे टाळावे?

दैवदुर्विलासाच्या उल्केसम मी आज तुटावे


पुनर्जन्म हो ऊर्टघनातुन

भटका, जिप्सी प्रवास घेउन

पृथ्वीच्या परिघापासुन की दूर दूर मी जावे?

काने,मात्रा,वेलांट्यांचे का कोडे होऊन जावे?