Monday, March 08, 2021

अर्ध्यामुर्ध्या परिघाचे गाणे

रुकारातल्या समेभोवती
थिजलेला मी अर्धा
व्याकुळतेच्या वृद्धीमधला
वेलांटीतुन अर्धा
या अर्ध्याचे त्या अर्ध्याशी वर्तुळ कैसे व्हावे
काने,मात्रा,वेलांट्यांचे का कोडे होऊन जावे?

गळाभेट, पण मीलन नाही,

परीमिती, पण स्थावर नाही,

द्विमीतीतल्या प्रदक्षिणेचे पाश कसे टाळावे?

दैवदुर्विलासाच्या उल्केसम मी आज तुटावे


पुनर्जन्म हो ऊर्टघनातुन

भटका, जिप्सी प्रवास घेउन

पृथ्वीच्या परिघापासुन की दूर दूर मी जावे?

काने,मात्रा,वेलांट्यांचे का कोडे होऊन जावे?


No comments: