Thursday, May 04, 2006

त्रास

'त्रास' ही माझी सगळ्यात लाडकी गझल. इतकी लाडकी, की माझं तिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम असेल. माझ्या इतर गझलांमधून जी अभिव्यक्ती झालेली नाही ती या गझलेतून झाली आहे, असे मला(च) वाटते. या गझलेसारखी दुसरी गझल किंवा कविता यापुढे माझ्याच्याने कधीच लिहिली जाणार नाही की काय असा एक (नकोसा वाटणारा) न्यूनगंड या गझलेने माझ्यात निर्माण केलाय.
ही ज़ुल्काफ़िया, गैर-मुरद्दफ़ गझल असून अशी गझल लिहिण्याचा हा माझा पहिलावहिलाच प्रयत्न होता, जो बव्हंशी यशस्वी ठरला आणि चिरंतन आत्मतृप्ती मिळवून देऊन गेला.
चपखल शब्दयोजना आणि मिसऱ्यांतून ओसंडून वाहणारे भाव हे या गझलेचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. तुम्हीही हिचे आशिक झालात तर त्यासारखी कौतुकाची पावती दुसरी कुठली नसेल माझ्यासाठी!
------------------------------------------------------------------
गर्दीत आठवांच्या झाले उदास जीणे,
विसरू कसा तुला मी? थांबेल श्वास घेणे.

मेघांतल्या सरींचा ग्रीष्मात भास होणे,
डोळ्यांतल्या ढगांनी मग पावसास गाणे.

सोसायचे किती मी हे लाड सागराचे?
(घेऊन चिंब लाटा भेटावयास येणे)

झाला सराव आता दुःखात रंगण्याचा,
बेरंग या सुखांची चित्रे भकास होणे.

शिकलोय मीच माझी भाषा मुक्या फुलांची,
उमलून एकदाचे कोमेजण्यास जाणे.

तू एकदा नव्याने, ये ना मिठीत माझ्या,
मी लांबवीन माझे मजलाच त्रास देणे.
--- चक्रपाणि बुध, १८/०१/२००६

1 comment:

Sumedha said...

कविता, गझला खूप आवडल्या. आणखी नोंदत रहा, वाचायला आवडतील!