Thursday, June 04, 2009

सौभाग्य

खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले

हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...

1 comment:

bhaanasa said...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले......खासच!

झोळीत घाल माझ्या अस्तित्व फाटलेले...वा!!

सुंदर. सगळीच कविता अतिशय सखोल अर्थ तोलून झालीय. आवडली.