Tuesday, June 27, 2006

दिवे,चंद्र,तारे अता मालवू दे (गझल)

दिवे,चंद्र,तारे अता मालवू दे
नव्या जीवनाची निशा ज़ागवू दे


कशी रंगते संगती मी तुझ्या ते
पुन्हा, वेगळे रंगुनी, दाखवू दे


ज़री संपले शब्द माझे तुझे अन्
खुणा बोलती, बोलणे वाढवू दे


गळाभेट घेते तुझ्या लोचनांची
मिठीनेच त्यांच्या मला लाज़वू दे


उरावे किती अन् कसे हे बहाणे?!
विसरण्या स्वतःला तयां आठवू दे


ज़से हुळहुळावे उरी पाकळ्यांनी
तुझे श्वास गाली तसे खेळवू दे


तुझे ओठ की गोडवा अमृताचा?
मुखी तू मला, मी तुला साठवू दे


सख्या,थांब थोडा. चुके एक ठोका,
तरी धीट मी, हे तुला भासवू दे

2 comments:

vasud said...

Nice one

Chakrapani said...

तुम्हा सगळ्यांना सांगण्यास आनंद होतोय, की माझ्या या गझलेचे एका सुंदर गीतात रुपांतर झाले आहे. कुवेतस्थित एक रसिक संगीतकार विवेक काज़रेकर यांनी त्यांचे मित्र अली आणि सुपुत्र वैभव यांच्या सहकार्यातून ही गझल स्वरबद्ध/सूरबद्ध केली आहे. आपल्यापैकी कोणाला ही गझल ऐकायची असेल, तर मला व्यक्तिश: संपर्क साधा म्हणज़े मी तुम्हाला ती पाठवू शकेन. धन्यवाद.